हेमाद्री’ अंक-१० प्रकाशन
हेमाद्री या मोडी लिपीतील हस्तलिखित १०व्या अंकाचे प्रकाशन दिनांक ११.०२.२०२३ रोजी ८व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलणात पार पडले. संमेलनाध्यक्ष मा. श्री. प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते हेमाद्री हस्तलिखित अंकाचे व ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई व ग्रामवाचनालय, तलवडे यांच्या वतीने आयोजित या संमेलनात स्वागताध्यक्ष श्री आप्पा साळवी, नागरिक संघाचे अध्यक्ष श्री सुभाष लाड, मोडी लिपी प्रशिक्षक व इतिहास अभ्यासक श्री सुनील कदम, श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, दादर चे श्री आशिष कदम उपस्थित होते.
शिवकाळात मोडी लिपीला राजलिपीचा दर्जा मिळाला, त्या काळातील सर्वाधिक पत्र आपल्याला मोडीलिपी मध्येच पाहायला मिळतात. १२व्या शतकापासून सुरु असलेली मोडी लिपी शिवकाळात अधिक बहरू लागली. बाळाजी आवजी चिटणीस यांच्या सुंदर हस्ताक्षराने पत्र आकर्षक दिसू लागली. राज्यव्यवहारकोष मधील लेखनवर्ग प्रमाणे शिवकालीन लेखन पद्धती सुरु झाली. महजर, दानपत्र, आज्ञापत्र, कतबापत्र, जाबिता, करारनामे अश्या प्रकारचे कागद शिवकाळात पाहायला मिळतात. हे सर्व कागद कलमबंद असत. प्रत्येक कलमाच्या शेवटी मर्यादेयं हा शिक्का आढळतो, तसेच तह व ठरावावर शिरोधारी ‘प्रतीपचंद्र’ हि मुद्रा आढळते, डाव्या बाजूस प्रधानाची मुद्रा व शेवटी मोर्तब सुद हि समाप्ती मुद्रा दिसते. पत्राची सुरुवात हिंदू कालगणने नुसार असलेल्या ‘स्वस्ति श्रीराज्याभिषेक शकाने’ होत असे. शिवकाळातील हे बदल कायम ठेऊन शिवकाळानंतर देखील अशीच लेखन पद्धत पाहायला मिळते.
हेमाद्रीच्या या अंकात शिवकाळातील याच वेगवेगळ्या लेखनपद्धतीचा व पत्रांचा अभ्यास दिलेला आहे. कौलनामा, महजर, नाव निशाणी,कतबा या विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेख देण्यात आले आहेत. सर्व लेखांचे देवनागरी लिप्यंतर देखील या अंकात वाचकांस वाचायला मिळतील. अंक नाविन्यपूर्ण असावा म्हणून या वेळेस एक शोध निबंध समाविष्ट केला आहे. पाली येथील हैबतराव देशमुख यांच्या समाधी वरील हा शोध निंबध श्री संदीप परब यांनी लिहिला आहे. अंक सजवण्यासाठी श्री अजय यादव यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे खूप कौतुक आहे. मुखपृष्ठ रचनाकार श्री सिद्धेश गुरव यांनी अंकाच्या विषयाला साजेसे असे मुखपृष्ठ तयार करून दिल्या बद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. मोडी लिपी प्रशिक्षणात उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या अंकातील लेखांचे मोडी लिपीत लिखाण केले आहे. मोडी लिपीचा प्रसार प्रचार करण्यासाठी आम्ही सर्व तत्पर आहोत पण हे सर्व सिद्ध करण्यासाठी तुम्हा वाचकांच्या सहकार्याची देखील गरज आहे.
हेमाद्री अंक-१० हस्तलिखित
संपादक व संकल्पना : श्री. पंकज भोसले
सहसंपादिका :सौ. अश्विनी सुर्वे
प्रमुख मार्गदर्शक : श्री. सुनिल कदम
सहाय्यक : प्रवीण मोहिते, ममता भोसले, मयुरी खरे
मुखपृष्ठ रचना : श्री. सिद्धेश गुरव
सदर अंक ई-पुस्तकाच्या स्वरूपात खालील संकेत स्थळावर उपलब्ध
आहे
https://drive.google.com/file/d/1UWMwqi2To1QT41Nn74vKC8xkYefHo-JF/view?usp=share_link
आपल्या प्रतिकृया व इतर अंक प्राप्त करण्यासाठी संपर्क करा.
https://hemadrimodilipi.blogspot.com/
ई-मेल : Hemadri.modilipi@rediffmail.com
संपर्क : ९८२१००९१३७
Hemadri ©
No comments:
Post a Comment